Wednesday, 3 February 2021

 


कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे

कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांची आज 118 वी जयंती त्यानिमित्त कर्मवीर मामांना मी विनम्र अभिवादन करतो. शंभर वर्षापूर्वी संपूर्ण देशावर इंग्रजांचे राज्य होते. देश पारतंत्र्यात होता. शिक्षण घेणे हे कोणत्याही व्यक्तीचा स्वतंत्र अधिकार मानला जात नव्हता. अशावेळी महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाची बीजे रोवली. तळागाळातल्या लोकांना शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी फुले- शाहू- आंबेडकर या विचारवंतांनी सर्वसामान्यापर्यंत शिक्षण देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यामधूनच कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील म्हणजेच कर्मवीर अण्णा, शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे, आदरणीय पंजाबराव देशमुख,कर्मवीर मामासाहेब जगदाळे, अशा अनेक शिक्षण विषयक जाण असलेल्या महाराष्ट्रातील सुपुत्रांनी शिक्षणाची ज्ञानगंगा खेड्यापाड्यापर्यंत, दीनदलित सामान्य रयतेपर्यत पोहोचवण्याचे कार्य केले, म्हणूनच आज महाराष्ट्राला एक सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेला आपणाला दिसून येतो.

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी शैक्षणिक कार्य करत असताना, जातीपातीच्या विद्यार्थ्यांचा विचार केला नाही. शिवाजी बोर्डिंग ची स्थापनाकरून गोरगरीब जनतेच्या मुलांना शिक्षण मिळेल यासाठी अथक प्रयत्न केले. संत गाडगेबाबा यांच्या विचाराने प्रेरित होऊन मामांनी शेतकरी, कष्टकरी पालकांच्या मनामध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण केली. वेळप्रसंगी मामांना विरोधाला सामोरे जावे लागले. धार्मिक अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी विरोध पत्करावा लागला.



बोर्डिंग मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मामा सकाळी लवकर उठत. प्रत्येक विद्यार्थ्यांनी व्यायाम केला पाहिजे. थोडेतरी मैदानी खेळ खेळले पाहिजेत याकडे मामांचे लक्ष होते. बोर्डिंग मध्ये, वाढलेल्या ताटामध्ये आमटी आणि भाकरी असायची. ती सर्व विद्यार्थ्यांनी संपवलीच पाहिजे याकडे मामांचे लक्ष होते. शिवाजी बोर्डिंग मध्ये राहणारी मुले शेतकऱ्यांचे असायची. पोतभर ज्वारी आणि थोडीफार फी भरून ती शिक्षण घेत असत. मामा स्वतः संस्थापक असून सुद्धा बोर्डिंगचे जेवणाचे पैसे दरमहा न चुकता भरत असत. यावरूनच त्यांची शिस्तबद्धता दिसून येते. बोर्डिंग मधील अनेक विद्यार्थी पुढे सुप्रतिष्ठित झाले. महाराष्ट्रातील कृषीभूषण, मोडलिंब येथील कचरे हे त्यापैकी एक. त्यांनी लिहिलेल्या कष्टाची भाकरी या लेखामध्ये मामांनी केलेले संस्कार अधोरेखित केले आहेत. जीवनामध्ये आलेले यश केवळ मामांच्या कष्टाच्या संस्कारांमुळे मिळाले असे ते म्हणतात आणि ते अगदी खरे आहे कारण बोर्डिंग झाले नसते, तर गोरगरिबांच्या मुलाला शिक्षण कधीच शक्य झाले नसते.

    

    तीर्थयात्रेवर पैसा व्यर्थ वाया घालण्याऐवजी आपल्या मुलांना शिक्षण द्यावे असे मामा म्हणत. आपला जन्मदिन साजरा करत असताना समाजाचे मी काही देणे लागतो या विचारातून मामांनी सीमेवर लढणाऱ्या आणि शहीद झालेल्या जवानांच्या प्रति  आदरभाव ठेवून वीरमाता आणि वीरपत्नी यांचा सन्मान केलेला आहे. शैक्षणिक कार्याबरोबरच गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बार्शी शहरांमध्ये एक सुसज्ज असे आरोग्य केंद्र म्हणजेच हॉस्पिटल हा विचार मामाच्या मनामध्ये आला.

शिवाजी बोर्डिंग मध्ये शिकत असलेले आणि पुढे वैद्यकीय शिक्षणातील उच्च पदवी मिळविण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे शिक्षण घेणारे संस्थेचे विद्यार्थी डॉ. बी. वाय. यादव यांच्यापुढे मामांनी बार्शी शहरात हॉस्पिटल उभारण्याचे स्वप्न मांडले. डॉक्टर तुम्ही ही जबाबदारी पूर्ण करणार का? की बाहेर कुठल्यातरी देशात जाऊन नोकरी करणार असा प्रश्न मामांनी डॉक्टरांना विचारला. परदेशातल्या ऑफर असतानासुद्धा डॉ. बी. वाय. यादव यांनी मामांच्या कार्यामध्ये सहभागी होण्याचे निश्चित केले. 1 फेब्रुवारी 1975 रोजी मामांच्या स्वप्नातील हॉस्पिटल सुरू झाले. स्थापना दिवसापासून डॉक्टर बी वाय यादव यांनी हॉस्पिटला सेवा देण्याचे सुरू केले.

जगदाळे मामा यांनी स्थापन केलेल्या हॉस्पिटलचे रूपांतर आज एक नामांकित हॉस्पिटल म्हणून सोलापूर जिल्ह्यात प्रसिद्ध झालेली आहे. जगदाळे मामा हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेने चालवलेले एकमेव तीनशे बेडचे असे हॉस्पिटल आहे.की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 20 तज्ज्ञ डॉक्टर आणि त्यांना सहाय्य करणारे अनेक डॉक्टर्स हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. कोरोनाच्या महामारी काळामध्ये बार्शी परिसरातील गोरगरीब जनतेचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी हॉस्पिटलने महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आपणाला दिसून येते.

एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या संत तुकाराम महाराजांच्या विचाराने प्रेरित झालेल्या मामांच्या कार्याला माझे शतशः नमन.