ज्ञानतपस्वी प्राचार्य अभयकुमार साळुंखे
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक संस्थापक परमपूज्य शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी महाराष्ट्रातील गोरगरीब कष्टकरी सामान्य जनतेच्या हितासाठी शिक्षण संस्थेची उभारणी केली. शिक्षणाचे पवित्र कार्य करत असताना अतिशय कष्टपूर्वक आणि उच्च ध्येयाने प्रेरित होऊन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना बापूजींनी केली. भारतातील शिक्षण संस्थांचा अभ्यास केल्यानंतर आपणाला असे दिसून येते की भारतामध्ये अनेक शिक्षण तज्ञांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा गौरव पूर्ण उल्लेख केलेला आहे. त्या पाठीमागे बापूजींचे शैक्षणिक विचार, प्रामाणिकपणे कार्य करण्याची कमालीची उच्च नीतिमत्ता, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था म्हणजेच माझी कुटुंब आणि त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने शिक्षण घेऊन देशाचा आदर्श नागरिक बनावे ही भावना शिक्षण महर्षी बापूजी यांच्याकडे होती.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कार्याचा आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उत्साहाचा भाग म्हणजे स्वामी विवेकानंद यांची जयंती. ही जयंती विवेकानंद जयंती सप्ताह म्हणून संस्थेमध्ये साजरी केली जाते. याच कालखंडामध्ये १७ जानेवारी ही तारीख संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब यांचा वाढदिवस म्हणून गुरुदेव कार्यकर्ते साजरा करण्याचे निश्चित करतात. परंतु साहेबांना ते कधीही तितकेसे रुचत नाही. संस्थेत १७ जानेवारी हा दिवस ज्ञानशिदोरी म्हणून साजरा केला जातो. या अंतर्गत विविध उपक्रम प्रत्येक शाखेवर राबवले जातात. ७५ वर्ष साहेबांना पूर्ण झाल्यानंतर साहेबांनी गुरुदेव कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा केला. त्यामध्ये साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू माझ्यासारख्या गुरुदेव कार्यकर्त्याला पाहायला मिळाले. कविवर्य गोविंदाग्रजांच्या शब्दांमध्ये सांगायचे तर राकट देशा, कणखर देशा,दंगडांच्या देशा, नाजुक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा असा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा, आणि संत तुकाराम महाराजांच्या भाषेत भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी मारू काठी असा महाराष्ट्र आणि त्यामधील आमचे रांगडे व्यक्तिमत्त्व म्हणजे आमचे साहेब.
एखाद्या सुप्रसिद्ध कुटुंबकर्त्याच्या पोटी जन्माला येणे हे जसे त्या व्यक्तीचे भाग्य असते तसेच कुटुंबकर्त्यांनी केलेले कार्य टिकवून ठेवणे हे सुद्धा त्याचे कर्तव्य असते. हे जाणून प्राचार्य अभय कुमार साळुंखे साहेब यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वाटचालीमध्ये शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी उभारलेल्या वटवृक्षाला कायमस्वरूपी विस्तारण्यासाठी त्याची मुळे जमिनीत घट्ट टिकवून धरण्यासाठी जे कष्ट सोसावे लागले ते शांत आणि संयमी अंतःकरणाने सोसले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची प्रार्थना आहे त्यामध्ये सत्य शील प्रामाणिकता त्याग पिळवणुकीस आळा, मानवाचे अधिष्ठान इशतत्त्व दर्शन, हे शब्द अतिशय प्रामाणिकपणे आणि त्याग पूर्ण भावनेने जगलेले व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब. कुटुंबातून मिळालेले संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे आणि बापूजी साळुंखे यांचे संस्कार सरांनी कधीही विसरले नाहीत. त्यामुळेच संस्थेचे शतक महोत्सव वर्ष साजरे होऊ शकले. साहेब ज्या ज्या वेळेस शाखेला भेट देतात त्या त्यावेळी प्रत्येक गुरुदेव कार्यकर्ता आणि सेवक वर्ग सुरुवातीला साहेब येण्यापूर्वी थोडासा दडपणात असतो पण जेव्हा साहेब समोर येतात आणि शाखेची माहिती घ्यायला लागतात त्यावेळी आपल्या घरातीलच ज्येष्ठ व्यक्ती बोलत आहे असे वाटायला लागते आणि कार्याध्यक्ष असलेल्या साहेबांच्या पुढेही सर्व गुरुदेव कार्यकर्ते शाखेच्या विस्तारासाठी विद्यार्थ्यांसाठी, प्रामाणिकपणे आपल्या भावना व्यक्त करतात. माझ्या महाविद्यालयामध्ये ज्यावेळेला साहेब दोन-तीन वेळा आले आणि आम्हा गुरुदेव कार्यकर्त्यांना बोलताना एक वाक्य बोलून गेले ही शाखा म्हणजे माझ्या आईचे स्मारक आहे त्यासाठी तुम्ही कोणतीही मागणी केली तरी मी नामंजूर करणार नाही. पण तुम्ही मुलींच्या शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. तासगाव मध्ये आल्यानंतर श्री रामानंद भारती विद्या मंदिर असो की पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील महाविद्यालय असो या शाखांना भेट देत असतानाच आमच्याही महाविद्यालयात साहेबांनी वेळोवेळी वेळ काढून भेट दिली. शाखेच्या विस्तारित इमारतीच्या बांधकामाच्या वेळी साहेब ज्यावेळेला महाविद्यालयात आले तेव्हा तासगाव मधील सेवानिवृत्त अजून सेवकांचेही मार्गदर्शन घेत चला कारण संस्था विकासामध्ये बापूजींना मोलाचे साथ देणारे गुरुदेव कार्यकर्ते या शहरांमध्ये आहेत असे साहेब आम्हाला नेहमी सांगत यातून प्रत्येक आजिव सेवकाबद्दल असलेला आदर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो.
प्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थी संख्या कमी असते म्हणून कधीही, कोणत्याही मागणीकडे त्यांनी दुर्लक्ष केले नाही. त्याग आणि समर्पण वृत्तीने कार्य करणे हे आपले कर्तव्य आहे.अशी शिकवण बापूजींची होती, संस्थामातांची होती. तशाच प्रकारच्या मुली आपल्या शाखेतून निर्माण करा असे भावपूर्ण उदगार साहेबांनी आमच्या समोर स्नेहकुंज अंकाच्या प्रथम प्रकाशनाच्या काढलेले आम्हा गुरुदेव कार्यकर्त्यांना आठवतात. आजची शिक्षण व्यवस्था टिकून आहे त्यामागे समाजातील कष्टकरी गोरगरीब जनतेचे आशीर्वाद, आपल्या पाठीमागे आहेत हे कधीही विसरू नका असे विचार साहेबांच्या बोलण्यातून नेहमी येतात. हे विचार म्हणजेच बापूजींची स्वरचित प्रार्थना होय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी अंतकरण पूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि विठ्ठलाच्या चरणी शतायुषी होवो अशी प्रार्थना करतो.
डॉ. अनिल पाटील.
सहयोगी प्राध्यापक
तासगाव
