Wednesday, 3 September 2025

संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे : सेवाभाव, त्याग आणि सुसंस्कारांची ज्योत

बेळगावचे सुप्रतिष्ठित शेतकरी दत्ताजीराव ऊर्फ नानासाहेब चव्हाण पाटील यांच्या सर्वात लहान सुकन्या म्हणजे सुशीलादेवी. यांचा जन्म 4 सप्टेंबर 1927 रोजी बेळगाव येथे झाला. शालेय शिक्षण बेळगाव येथील महानगरपालिकेच्या शाळेत झाले. त्यावेळच्या प्रथेनुसार सातवीनंतर त्यांचे शिक्षण बंद झाले. बालवयापासूनच सेवाभाव, जिव्हाळा, सात्विकता, कामाचा उरक, व्यवहारचातुर्य आणि नीटनेटकेपणा हे गुण त्यांच्यामध्ये रुजलेले होते. बापूजींचे ज्येष्ठ बंधू परशुरामभाऊ यांनी लग्नासाठी बापूजींना सुशीलादेवी यांचे स्थळ सुचविले, आणि 15 डिसेंबर 1940 रोजी बेळगावच्या माळ हनुमान मंदिरात बापूजींचा आणि सुशीलादेवी यांचा विवाह संपन्न झाला. सत्यशोधक विचारांच्या बापूजींनी हा विवाह अत्यंत साध्या पद्धतीने घडवून आणला. लग्नानंतर काही काळ डॉ. अप्पासाहेब पवार यांनी बापूजींवर सोंडूरच्या इतिहास संशोधनाची जबाबदारी सोपवली. सोंडूर संस्थानांमध्ये संस्थानचे राजे यशवंतराव घोरपडे यांनी राजपुत्राचे राजगुरू होण्याची विनंती केली. येथूनच त्यांना परदेशी जाण्याची संधी निर्माण झाली, परंतु बापूजींच्या जीवनावर महात्मा गांधी यांच्या विचाराचा प्रभाव पडलेला होता. देश पारतंत्र्यात जखडलेला असताना आपण पाश्चात्य देशांमध्ये जाऊन बसावे हे त्यांना मनोमन पटत नव्हते. संस्थानचे राजे यशवंतराव घोरपडे महाराज यांना नम्रपणे परदेशी जाण्यास नकार दिला. पुढे 1942 च्या रणसंग्रामात सहभाग नोंदविला. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली बापूजी लढा देत होते. स्वातंत्र्य लढ्यामध्ये भूमिगत राहून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बापूजींनी योगदान दिले, तसेच कुटुंबाची जबाबदारी सांभाळतच सुशीलादेवी यांनी सुद्धा प्रपंच व्यवस्थितपणे केला. इतिहास संशोधकाच्या भूमिके नंतर आणि स्वतंत्र संग्रामात भाग घेतल्यानंतर डॉ.बापूजी साळुंखे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सांगण्यावरून सन 1949 रोजी बापूजी रयत शिक्षण संस्थेमध्ये सातारा येथे शिक्षक म्हणून रुजू झाले. रयत शिक्षण संस्थेमध्ये रयत सेवकाची भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. ही भूमिका बजावत असताना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल असलेला आदर दिसून येतो. कर्मवीरांच्या पत्नी सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील म्हणजेच वहिनी यांचा आणि सुशीलादेवी साळुंखे यांचा स्नेह सर्वपरिचित आहे. कर्मवीरांनी बापूजी साळुंखे यांच्या द्वितीय कन्येचे नामकरण स्वतः केलेले आहे त्यांनी सुधा हे नाव ठेवलेले होते. यामधून कर्मवीर अण्णांच्या कुटुंबाप्रती असलेला आदर आणि स्नेहभाव बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशीला देवी साळुंखे यांच्यामध्ये असलेला दिसून येतो. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक बापूजी साळुंखे. हे इतिहास संशोधक, गांधीवादी विचारसरणीचे स्वातंत्र्यसैनिक आणि सामान्य जनतेच्या शिक्षणासाठी कायम ध्येयवाद बाळगून असणारे एक तरुण व्यक्तिमत्व. अशा व्यक्तिमत्वाला कुटुंबामध्ये बांधून ठेवणे कदापीही शक्य नाही याची मनोमन जाणीव ठेवून संसार करणे म्हणजे एक विलक्षण काम होय. परंतु बापूजींच्या प्रत्येक कार्यामध्ये सुशीलादेवींनी म्हणजेच बाईंनी मोलाची साथ दिली. सुरुवातीचा संसार आनंदात झाला परंतु बापूजी सतत कार्यमग्न असल्यामुळे आणि ध्येयवादाने प्रेरित झाल्यामुळे संसाराचा सर्व गाढा चालविण्याचे काम बाईंनी यशस्वीपणे करून दाखविले. कुटुंबातील सर्वच मुलांना सुसंस्कारित केले. सुशिलादेवी यांना सर्वजण आदराने बाई म्हणत असत जीवन का जगायचे, कशासाठी जगायचे हा विचार बापूजींनी निश्चित केलेला होता. आपल्या जीवनात शालेय शिक्षण घेत असताना आलेले कष्ट कोणत्याही मुलाच्या नशिबी येऊ नये या विचारातून ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीदवाक्य बापूजींनी निश्चित केले, आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना बापूजींनी केली. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था स्थापन झाल्यानंतर सुरुवातीला वसतिगृहामध्ये स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाकी महिला गरजेच्या होत्या. पण पगार वीस रुपये द्यायचा कुठून, ही अडचण ओळखून बाईनीं स्वतः स्वयंपाक करणे निश्चित केले आणि वसतिगृहातील सर्व मुलांच्या त्या माता झाल्या. लौकिक अर्थाने केवळ बापूजींच्या मुलांची माता न राहता संस्थामाता झाल्या. मातृदेवो भव| पितृदेवो भव| आचार्यदेवो भव| त्याप्रमाणेच दारिद्र्यदेवो भव| हे स्वामी विवेकानंदांचे विचार बापूजींनी आणि संस्थामाता सुशीलादेवी यांनी जीवनभर अंगीकारले. महात्मा गांधीजींचा प्रभाव बापूजींच्यावरती होता. संस्थामाता सुशीलादेवी यांच्यावरती होता. बापूजी गांधीवादी होते. पण गांधीवादाचे कर्मकांड बापूजींनी आणि संस्थामाता यांनी कधीही केले नाही. गोरगरिबांची सेवा करण्याचे व्रत दोघांनीही घेतले. साधी राहणी आणि उच्चविचार या गुणांचा अंगीकार या दाम्पत्याने आयुष्यभर सांभाळला. गांधीवादाचा पगडा केवळ बापूजी साळुंखे यांनी स्वतःच जपला असे नव्हे तर तो प्रभाव सुशीलादेवी साळुंखे यांनी सुद्धा आपल्या साधी राहणी आणि उच्च विचारसरणीतून दाखवून दिलेला आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील गोरगरिबांची मुले शाळेमध्ये प्रवेश घेऊ शकली आणि उच्चशिक्षित होऊ शकली. वसतिगृहातील मुलांना सुसंस्कार देण्याचे कार्य संस्थामाता सुशीलादेवी यांनी मातेच्या मायेने केले. वसतिगृहातील मुलांच्या कपडे शिलाईसाठी खर्च होऊ नये म्हणून बाईंनी स्वतः शिलाई कोर्स शिकून घेतला आणि वसतिगृहातील मुलांचे गणवेश तयार केले. वसतिगृहामध्ये शिक्षण घेणारी मुले कधी आजारी पडत अशावेळी बाईनीं स्वतः रात्रभर जागरण करून मुलांची सेवा केली. संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांनी आपले जीवन पूज्य बापूजींच्या ध्येयवादासाठी अखेरच्या श्वासापर्यंत समर्पित केले. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन शिक्षणाचे कार्य पवित्रपणे करणे हीच संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांना आदरांजली ठरेल. डॉ. बापूजी साळुंखे आणि सुशीला देवी साळुंखे यांच्या बालवयातच त्यांचे मातृछत्र हरवलेले होते. त्यामुळे दोघांनाही आईची जाणीव काय असते हे माहीत असल्याकारणाने त्यांनी ती कमतरता कुटुंबातील आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीमध्ये भरून काढण्याची भूमिका पार पाडली. बापूजी साळुंखे हे शिस्तबद्ध जीवन जगत असले तरीसुद्धा ते संत ज्ञानेश्वर सारखे माऊलीच्या हृदयाचे होते. असे म्हणण्याचे मुख्य कारण म्हणजे ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहिले आणि बापूजी साळुंखे यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची प्रार्थना लिहिली ती सर्वसामान्यांना सुसंस्कारित करण्यासाठी. हाच विचार सुशिलादेवी साळुंखे यांनी सुद्धा आयुष्यभर जतन केला. त्या दैवीगुणसंपन्न होत्या. त्यांच्याकडे चांगले सुसंस्कार होते. कोणालाही दुखवायचे नाही. कोणताही मोह ठेवायचा नाही. आहे त्यामध्ये समाधानी राहायचे. घरामध्ये बापूजींना भेटायला आलेल्या लोकांचे स्वागत नेहमी हसतमुख चेहऱ्याने करावयाचे. दुसऱ्याचे कल्याण यातच आपले सुख समावलेले आहे हे लक्षात ठेवून प्रत्येकाची सेवा करायची अशी भूमिका त्यांनी जपली. सुशीलादेवी साळुंखे यांनी लग्नगाठ बांधल्यापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत एक श्रद्धागाठ बांधलेली होती. ती म्हणजे डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी निवडलेला मार्ग म्हणजे आपले जीवन कार्य होय. पतीचे कार्य हे आपले जीवन कार्य आहे या विचारातून बापूजींना त्यांनी साथ दिली आणि त्यामुळे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा शैक्षणिक, सांख्यिकीय आणि गुणवत्ता पूर्ण विकास झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. महाराष्ट्राच्या शिक्षण विस्तारातील कर्मवीर भाऊराव पाटील हे पूर्वार्ध आहेत तर डॉ. बापूजी साळुंखे हे उत्तरार्ध आहेत असे श्री रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव चे पहिले माजी प्राचार्य तसेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर चे कुलगुरू कैलासवासी डॉ.कणबरकर सर यांनी म्हटले आहे. या दोघही महापुरुषांच्या बाबतीमध्ये त्यांच्या पत्नींचे म्हणजेच लक्ष्मीबाई भाऊराव पाटील आणि श्रीमती सुशीला देवी साळुंखे यांचे योगदान अतुलनीय असे आहे. महान इंग्रजी कवी विल्यम राॅस वाॅलेस यांनी मातेसाठी एक कविता लिहिली होती त्याचे नाव होते hand that rocks the cradle. त्याचा स्थूल अर्थ जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी असा होता. महापुरुषांच्या जीवन कार्यामध्ये स्वतः कधीही समोर न येता कार्य करणाऱ्या संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांनी असेच कार्य केले. त्यामुळे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था बहुजनांच्या जीवनामध्ये ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्काराचे कार्य करू शकली त्या पाठीमागे त्यागमूर्ती सुसंस्कारी आणि दैवी गुणसंपन्न संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांचाही सिंहाचा वाटा होता. त्यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन.

1 comment:

  1. आदरणीय प्रा डॉ अनिल पाटील सर आपण लिहिलेला हा लेख संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या सेवाभावी जीवनाचे अत्यंत प्रेरणादायी चित्रण करतो. त्यांनी बापूजींच्या कार्याला पूर्ण समर्पण देऊन कुटुंब आणि समाज या दोन्ही आघाड्यांवर विलक्षण संतुलन साधले. त्यांच्या त्याग, सुसंस्कार आणि साध्या परंतु उच्च विचारसरणीमुळे हजारो विद्यार्थ्यांचे जीवन घडले. अशा मातृशक्तीला जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

    ReplyDelete