Sunday, 13 October 2024
वाचन प्रेरणा दिन - ग्रंथ परिचय
Tuesday, 1 October 2024
मानव्याचे अधिष्ठान : महात्मा गांधी आणि शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांची प्रार्थना
शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे हे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर चे संकल्पक, संस्थापक. बापूजींच्या जीवनावरती महात्मा गांधी यांच्या विचाराचा प्रभाव बालवयापासूनच पडलेला आपणाला दिसून येतो. शालेय शिक्षण घेत असताना देश स्वातंत्र्याच्या बातम्या कानावर पडत होत्या. बापूजी लहान वयातच शिक्षण घेत असतानाच स्वातंत्र्यासाठी अस्वस्थ होत होते. त्याचाच प्रभाव म्हणजे स्वातंत्र्यसंग्रामामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांच्या बरोबर बापूजींनीही स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर ते अहिंसात्मक मार्गाने मिळविले पाहिजे हे विचार महात्मा गांधीजींनी मांडले. या विचाराकडे स्वातंत्र्य लढ्यातील तरुण पिढी आकर्षित होत गेली. आपल्या सर्वस्वाचा त्याग करून काही तरुणांनी अहिंसात्मक मार्गाने सत्याग्रह चालू केला. त्यापैकीच एक म्हणजे शिक्षण महर्षी परमपूज्य डॉ. बापूजी साळुंखे. स्वातंत्र्य प्राप्ती पूर्वी देशातील शिक्षण व्यवस्थेला आकार देण्यासाठी छत्रपती राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा कार्य करत होते. सुरुवातीच्या कालखंडामध्ये बापूजी साळुंखे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शाखांमध्ये शिक्षक व मुख्याध्यापकांची भूमिका पार पाडली. शिक्षण तळागाळातील सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपणही स्वतंत्र शिक्षण संस्था उभी करावी या विचारातून बापूजी साळुंखे यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली. "ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार" या ध्येयाने प्रेरित होऊन पुढे संस्था कार्यरत राहील हे बापूजींनी निश्चित केले. बालकांचे विचारसरणी सुसंस्कारी करण्यासाठी बापूजींनी स्वतः श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची प्रार्थना लिहिली. ही प्रार्थना म्हणजे महात्मा गांधीजींच्या विचारांचे सार आहे. महात्मा गांधीजींना अभिप्रेत असलेले सत्य,शील, प्रामाणिकता, त्याग, पिळवणुकीस आळा हे विचार बापूजींनी आपल्या प्रार्थनेतून गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यासमोर मांडले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या संस्कार केंद्रामध्ये प्रार्थना म्हटली जाते. त्यामुळे असे म्हणावे वाटते की शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे हे सुद्धा आचार्य विनोबा भावे यांच्यासारखेच महात्मा गांधीजींच्या आचार्य कुलाचे एक उपासक होते. महात्मा गांधीजींना अभिप्रेत असलेल्या आचार्य कुलाची संकल्पना बापूजींनी जोपासली, त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्रात अनेक ज्ञानमंदिरे उभी केली. शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांनी लिहिलेली प्रार्थना ही महात्मा गांधीजींच्या अहिंसात्मक मार्गाची उपासना आहे. त्यासाठी आज महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने, महात्मा गांधी यांच्या विचारांची रुजवणूक करण्यासाठी शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांची प्रार्थना अंगीकारणे हीच महात्मा गांधीजींना खरी आदरांजली ठरेल.


