Friday, 26 September 2025

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांचे शैक्षणिक वारसदार

कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांनी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी ची स्थापना केली, त्यामुळे बहुजन समाजातील अनेक मुला-मुलींना शिक्षणाचे प्रवेशद्वार खुले झाले. कर्मवीर मामा साहेबांचा शिक्षणाचा उदात्त विचार हा शैक्षणिक क्रांती घडवून आणणार होता. त्यामधूनच अनेक विद्यार्थी घडत गेले. कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या नंतर त्यांच्या कार्याचा शैक्षणिक वारसा जपणारे एक नाव म्हणजे डॉ. बी.वाय. यादव हे होय. बार्शी शहरांमध्ये डॉ. हिरेमठ साहेब यांनी प्रथमतः आरोग्य मंदिर उभा केले. परंतु तालुक्यामध्ये आरोग्य सुविधा वाढल्या पाहिजेत हा विचार कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या मनामध्ये निर्माण झाला, त्याला मूर्त रूप देण्याचे काम डॉक्टर बी. वाय यादव यांनी केले. मिरज मेडिकल कॉलेजचे नामांकित डीन डॉ.फ्लेचर यांनी मिशनरी वृत्तीने अनेक विद्यार्थी घडविले. गोरगरिबांची सेवा करणे हाच डॉक्टरांचा धर्म आहे हा विचार डॉक्टर फ्लेचर आणि कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांनी त्यांच्या कार्यातून निर्माण केलेला होता. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये आपण डॉक्टर झालो परंतु कोणत्याही आर्थिक सुबत्ता मिळविण्यापेक्षा गोरगरिबांची सेवा करणे हीच खऱ्या अर्थाने मामासाहेबांची शिकवण आहे ती सोडून चालणार नाही म्हणून डॉ. बी वाय यादव यांनी बार्शी मध्ये आरोग्य सेवेचे कार्य हाती घेतले. कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या विचारांचे पाईक म्हणण्याचे कारण म्हणजे वयाच्या 80 व्या वर्षानंतर सुद्धा त्यांनी मामासाहेबांचे विचार सोडले नाही. अत्यंत कुशल, शांत आणि गोरगरिबांच्या आरोग्याबद्दल असलेली सेवावृत्ती यामुळे त्यांना बार्शी भूषण सन्मानाने पुरस्कृत केले जात आहे, हा डॉक्टर साहेबांपेक्षा अधिक बार्शीकरांचा सन्मान आहे. डॉक्टर साहेबांच्या कार्यांचा प्रभाव अनेकांवर पडला अनेक डॉक्टर्स त्यांच्या हाताखाली घडले. 1990 मध्ये माझ्या मित्राच्या आईचे म्हणजेच आमच्या भाभीचे गळ्यातील (आवळ मोठी पाच किलो पेक्षा जास्त गाठ) असलेले गुंतागुंतीचे ऑपरेशन करण्याचे निश्चित झाले होते. डॉ. हिरेमठ, डॉ. नेने आणि डॉ.बी. वाय यादव यांनी ते ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडले. ऑपरेशन थिएटर मध्ये भूल दिल्यानंतर असे लक्षात आले की ऑपरेशन खूप क्लिष्ट आणि गुंतागुंतीचे आहे काय करायचे अशावेळी डॉक्टर बी वाय यादव यांनी धाडसाने ती गळ्याभोवती असलेली गाठ काढली. त्यावेळी जवळजवळ तीन तास चाललेले ऑपरेशन पूर्ण झाले. आणि ऑपरेशन थेटर मधून डॉक्टर बाहेर आल्यानंतर अगदी शांतपणे म्हणाले आता भाभीचा धोका टाळला. त्यावेळी नेने साहेब आणि हिरेमठ यांनी हे पूर्ण श्रेय डॉक्टर यादवांचे आहे असे भाभींना सांगितले. पन्नास वर्षाच्या भाभी त्यानंतर जवळजवळ 35 वर्षे आरोग्यपूर्ण आयुष्य जगल्या ते केवळ डॉक्टर साहेबांच्यामुळे, त्यामुळे मी कायमस्वरूपी त्यांच्यासमोर नतमस्तक होत गेलो. व्यक्तिगत पातळीवर हा किस्सा सांगण्याचे कारण म्हणजे त्यावेळी सोलापुरातल्या अनेक डॉक्टरांनी सांगितले होते की हे ऑपरेशन केवळ मुंबई शहरातच होऊ शकते तुमच्या बार्शीत नाही. त्यानंतर अनेक प्रसंगांमध्ये डॉक्टरांना भेटायचं अनुभव आला ऑपरेशन झाल्यानंतर किती बिल द्यायचे असे विचारल्यानंतर अबोल असणारे डॉक्टर कायम स्मरणात राहतात. कारण कोणत्याही पेशंटला आपण अधिकचा पैसा डॉक्टरांना देत आहोत असे वाटत नाही. नाम मात्र फी मध्ये उत्तम सेवा देणारे डॉक्टर बार्शीला लाभले हे केवळ कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्यामुळे. जवळजवळ 50 वर्षापेक्षा अधिकचा काळ आरोग्य सेवेला अर्पण केलेल्या डॉक्टर साहेबांच्या मनामध्ये आरोग्यविषयक अनेक स्वप्न होती त्यापैकी एक म्हणजे कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी स्थापन केलेल्या हॉस्पिटलमध्ये ट्रामा युनिट असले पाहिजे. अगदी कमी खर्चात सामान्य जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ती काळाची गरज आहे हे ओळखून त्यांनी ते प्रयत्न केले आणि बार्शी शहरांमध्ये ट्रामा युनिट सुरू झाले ते केवळ डॉक्टर साहेबांच्यामुळे. सतत 80 वर्ष एकाच विचाराने कार्य करणाऱ्या ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर बी. वाय. यादव यांना त्यांच्या जन्मदिनी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या हातून अनेक उत्तम कार्य घडत जावो ही भगवंत चरणी प्रार्थना.

1 comment:

  1. सर,लेख अतिशय प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी आहे. यातून कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांची शैक्षणिक व सामाजिक परंपरा आणि डॉ. बी. वाय. यादव यांची सेवाभावना, त्याग व कार्यतत्परता प्रभावीपणे उजागर झाली आहे. अशा व्यक्तिमत्त्वांच्या कार्यकथांनी पुढील पिढ्यांना समाजसेवेची दिशा मिळते.

    ReplyDelete