संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे
बेळगावचे
सुप्रतिष्ठित शेतकरी दत्ताजीराव ऊर्फ नानासाहेब चव्हाण पाटील यांच्या सर्वात लहान
सुकन्या म्हणजे सुशीलादेवी. यांचा जन्म 4 सप्टेंबर 1927 रोजी बेळगाव येथे झाला. शालेय शिक्षण बेळगाव येथील
महानगरपालिकेच्या शाळेत झाले. त्यावेळच्या प्रथेनुसार
सातवीनंतर त्यांचे शिक्षण बंद झाले. बालवयापासूनच सेवाभाव, जिव्हाळा, सात्विकता, कामाचा उरक, व्यवहारचातुर्य आणि नीटनेटकेपणा हे गुण त्यांच्यामध्ये
रुजलेले होते. बापूजींचे ज्येष्ठ बंधू परशुरामभाऊ यांनी लग्नासाठी बापूजींना सुशीलादेवी
यांचे स्थळ सुचविले, आणि 15 डिसेंबर 1940 रोजी बेळगावच्या
माळ हनुमान मंदिरात बापूजींचा आणि
सुशीलादेवी यांचा विवाह संपन्न झाला. सत्यशोधक विचारांच्या बापूजींनी हा विवाह अत्यंत साध्या पद्धतीने घडवून आणला.
लग्नानंतर काही
काळ डॉ. अप्पासाहेब पवार यांनी बापूजींवर सोंडूरच्या
इतिहास संशोधनाची जबाबदारी सोपवली. सोंडूर संस्थानांमध्ये संस्थानचे राजे यशवंतराव
घोरपडे यांनी राजपुत्राचे राजगुरू होण्याची विनंती केली. येथूनच त्यांना परदेशी
जाण्याची संधी निर्माण झाली, परंतु बापूजींच्या
जीवनावर महात्मा गांधी यांच्या विचाराचा प्रभाव पडलेला होता. देश पारतंत्र्यात जखडलेला असताना आपण पाश्चात्य देशांमध्ये
जाऊन बसावे हे त्यांना मनोमन पटत नव्हते. संस्थानचे राजे
यशवंतराव घोरपडे महाराज यांना नम्रपणे परदेशी जाण्यास नकार दिला. पुढे 1942 च्या रणसंग्रामात सहभाग
नोंदविला. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली बापूजी लढा देत होते. स्वातंत्र्य लढ्यामध्ये भूमिगत राहून भारताला स्वातंत्र्य
मिळवून देण्यासाठी बापूजींनी योगदान दिले, तसेच कुटुंबाची
जबाबदारी सांभाळतच सुशीलादेवी यांनी सुद्धा प्रपंच व्यवस्थितपणे केला.
सन 1949 रोजी बापूजी रयत शिक्षण संस्थेमध्ये सातारा येथे
शिक्षक म्हणून रुजू झाले. अण्णांच्यावर असलेली श्रद्धा आणि विद्यार्थ्यांना
घडवण्याची जबाबदारी बापूजींनी स्वीकारली. साताऱ्यामध्ये सुशीलादेवी यांना कर्मवीर
अण्णांच्या पत्नी सौ लक्ष्मीबाई म्हणजेच वहिनींचा सहवास लाभला.
स्वामी विवेकानंद
शिक्षण संस्थेचे संकल्पक बापूजी साळुंखे. हे इतिहास संशोधक, गांधीवादी विचारसरणीचे
स्वातंत्र्यसैनिक आणि सामान्य जनतेच्या शिक्षणासाठी कायम ध्येयवाद बाळगून असणारे
एक तरुण व्यक्तिमत्व. अशा व्यक्तिमत्वाला कुटुंबामध्ये बांधून ठेवणे कदापीही शक्य
नाही याची मनोमन जाणीव ठेवून संसार करणे म्हणजे एक विलक्षण काम होय. परंतु बापूजींच्या
प्रत्येक कार्यामध्ये सुशीलादेवींनी म्हणजेच बाईंनी मोलाची साथ दिली. सुरुवातीचा
संसार आनंदात झाला परंतु बापूजी सतत कार्यमग्न असल्यामुळे आणि ध्येयवादाने प्रेरित
झाल्यामुळे संसाराचा सर्व गाढा चालविण्याचे काम बाईंनी यशस्वीपणे करून दाखविले.
कुटुंबातील सर्वच मुलांना सुसंस्कारित केले. सुशिलादेवी यांना सर्वजण आदराने बाई म्हणत असत
जीवन का जगायचे, कशासाठी जगायचे हा विचार
बापूजींनी निश्चित केलेला होता. आपल्या जीवनात शालेय
शिक्षण घेत असताना आलेले कष्ट कोणत्याही मुलाच्या नशिबी येऊ नये या विचारातून ज्ञान
विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे
ब्रीदवाक्य बापूजींनी निश्चित केले, आणि श्री स्वामी
विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना बापूजींनी केली.
स्वामी विवेकानंद
शिक्षण संस्था स्थापन झाल्यानंतर सुरुवातीला वसतिगृहामध्ये स्वयंपाक करण्यासाठी
स्वयंपाकी महिला गरजेच्या होत्या. पण पगार वीस रुपये द्यायचा कुठून, ही अडचण ओळखून बाईनीं स्वतः स्वयंपाक करणे निश्चित केले
आणि वसतिगृहातील सर्व मुलांच्या त्या माता झाल्या. लौकिक अर्थाने केवळ बापूजींच्या
मुलांची माता न राहता संस्थामाता झाल्या.
मातृदेवो
भव| पितृदेवो
भव|
आचार्यदेवो भव|
त्याप्रमाणेच दारिद्र्यदेवो भव| हे स्वामी
विवेकानंदांचे विचार बापूजींनी आणि संस्थामाता सुशीलादेवी यांनी जीवनभर अंगीकारले.
महात्मा गांधीजींचा प्रभाव बापूजींच्यावरती होता. संस्थामाता सुशीलादेवी
यांच्यावरती होता. बापूजी गांधीवादी होते.
पण गांधीवादाचे कर्मकांड बापूजींनी आणि संस्थामाता यांनी कधीही केले नाही. गोरगरिबांची सेवा करण्याचे व्रत दोघांनीही
घेतले. साधी राहणी आणि उच्चविचार या गुणांचा अंगीकार या
दाम्पत्याने आयुष्यभर सांभाळला. म्हणूनच महाराष्ट्रातील गोरगरिबांची मुले
शाळेमध्ये प्रवेश घेऊ शकली आणि उच्चशिक्षित होऊ शकली.
वसतिगृहातील मुलांना सुसंस्कार देण्याचे कार्य संस्थामाता सुशीलादेवी यांनी
मातेच्या मायेने केले. वसतिगृहातील मुलांच्या
कपडे शिलाईसाठी खर्च होऊ नये म्हणून बाईंनी स्वतः शिलाई कोर्स शिकून घेतला आणि
वसतिगृहातील मुलांचे गणवेश तयार केले. वसतिगृहामध्ये
शिक्षण घेणारी मुले कधी आजारी पडत अशावेळी बाईनीं स्वतः रात्रभर जागरण करून
मुलांची सेवा केली. संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांनी आपले जीवन पूज्य बापूजींच्या
ध्येयवादासाठी अखेरच्या श्वासापर्यंत समर्पित केले. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन शिक्षणाचे कार्य पवित्रपणे करणे हीच
संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांना आदरांजली ठरेल.

खूप छान लेख लिहिला आहे. संस्थामातांची माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल.
ReplyDelete