Friday, 22 September 2023

पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा

                  पद्मभूषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील




पद्मभूषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील म्हणजेच कर्मवीर अण्णा यांची आज जयंती. कर्मवीर अण्णांचा जन्मः 22 सप्टेंबर 1987 रोजी कुंभोज या गावी झाला. घरातील वातावरण हे धार्मिक स्वरूपाचे होते. त्यांचे पूर्वज जैन मुनि बनले होते. कर्मवीर अण्णा लोकअर्थाने धार्मिक नसले तरीसुद्धा धर्माचे मर्म जाणलेले ते जाणते सुधारक होते. शालेय शिक्षण घेत असताना वेगवेगळ्या गावांमध्ये त्यांना जावे लागले कारण वडील पायगोंडा पाटील यांच्या सततच्या होणाऱ्या बदल्यांमुळे एकाच शाळेत शिक्षण घेता आले नाही.

1902 ते 1909 या कालावधीमध्ये अण्णांनी कोल्हापूर येथील जैन बोर्डिंग मध्ये प्रवेश घेऊन हायस्कूलचे शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरची लाल माती अण्णा सारख्या रांगड्या व्यक्तिमत्वाला शांत बसू देत नव्हती. तालीम करणे, कुस्ती खेळणे हा त्यांचा छंद होता. यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ लागले. इंग्रजी सहावीच्या वर्गात नापास झाल्यानंतर खुद्द छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी अण्णांची शिफारस श्री भार्गवराम कुलकर्णी या शिक्षकांच्याकडे उत्तीर्ण करण्यासाठी केली. मुलगा प्रामाणिक आहे याच्याकडे लक्ष द्या आणि पुढील वर्गात याला प्रवेश द्या असे म्हटल्यानंतर श्री भार्गवराम कुलकर्णी  सरांनी एक वेळ मी या वर्गातील बाक पुढच्या वर्गात नेहील पण याला उत्तीर्ण करणार नाही असे निक्षून सांगितले. आपण मॅट्रिक परीक्षेपर्यंत जाणार नाही हे अण्णांच्या लक्षात आले. अशावेळी दुःखी न होता किंवा शिक्षकाबद्दल मनात राग न ठेवता, त्यांच्याबद्दल कायमस्वरूपी आदर ठेवून हायस्कूलचे शिक्षण सोडून दिले. या कालखंडामध्ये काही चांगल्या गोष्टी घडल्या त्या म्हणजे अण्णांना  छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा सहवास लाभला.

लौकिक अर्थाने शालेय शिक्षण अपूर्ण राहिले असले तरी छत्रपती शाहू महाराजांच्या सान्निध्यामुळे सत्यशोधक विचारांची बीजे रुजली गेली. समाजातील स्पृश्य अस्पृश्यता हे अधोगतीचे मुख्य कारण आहे हे अण्णांनी जाणले. महात्मा ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या सत्यशोधक विचारातून अण्णांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांनी स्थापलेल्या सत्यशोधक मंदिरावर पताका फडकविण्याचे काम कर्मवीर अण्णांनी केले. रयत म्हणजे सामान्य जनता आणि त्या सामान्य जनतेला शिक्षण देणारी संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्था होय. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे ध्येयवाक्य निश्चित करून शिक्षणाची ज्ञानगंगा खेड्यापाड्यापर्यंत पोहचवण्याची  किमया रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनीसुद्धा स्वराज्याची स्थापना करत असताना रयतेला देवत्व दिले होते. त्याच विचारातून अण्णांनी शिक्षण संस्थेचे नाव रयत शिक्षण संस्था असे निश्चित केल्याचे आपणाला दिसून येते. शिक्षणातून सामान्य जनतेला ज्ञानी केले आणि त्यामधून अनमोल अशी रत्ने जन्माला आली. सातारा येथे स्थापन केलेल्या वसतिगृहाला शाहू महाराजांचे नाव दिले. या  वसतिगृहामध्ये सर्व जाती-धर्माची मुले एकाच ठिकाणी राहतील, भोजन करतील याची व्यवस्था कर्मवीर अण्णांनी केली. सुरुवातीला हे काम कष्टाचे व कठीण होते. समाज जाती व्यवस्थेमध्ये विखुरलेला होता. शिक्षणाचे महत्त्व तितकेसे लोकांना पटलेले नव्हते. मुलांना शिक्षणासाठी घराबाहेर ठेवणं  ही चैन वाटत होती.  आर्थिक दारिद्र्यामुळे ते परवडणारे नव्हते.  गोरगरिबांची मुले शिकली पाहिजेत ही तळमळ घेऊन अण्णांनी हा भगीरथ ओढण्याचे ठरवले. यासाठी सातारचे शाहू महाराज यांनी स्वतःची जमीन अण्णांना शिक्षण संस्था उभारण्यासाठी दिली. तसेच समाजातील प्रत्येक गोरगरीब जनतेने अण्णांना मदत केली.

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते असे म्हणतात कर्मवीर अण्णांच्या पाठीमागे सुद्धा आई गंगामाई आणि पत्नी लक्ष्मीबाई यांचे योगदान मोठे होते. लग्न झाल्यानंतर सोन्याने मढवलेली लक्ष्मी अण्णांच्या कार्यामध्ये समरस झाल्या आणि अंगावरचे सर्व दागिने वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी वेळप्रसंगी विकून लंकेची पार्वती झाल्या. अगदी सौभाग्याचा अलंकार सुद्धा शेवटी विकावा लागला; परंतु वसतिगृहातील मुलांचे शिक्षण थांबू दिले नाही. गोरगरिबांची खेड्यातील मुले शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी दारोदारी हिंडून गोळा केली. त्यामधील एक नाव म्हणजे पांडुरंग गणपत पाटील बुधगाव च्या या विद्यार्थ्याला अण्णांनी सातारच्या रयत संस्थेमध्ये आणले आणि शालेय शिक्षणापासून ते बॅरिस्टर होईपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च संस्थेमार्फत केला. पांडुरंग गणपत पाटील हे पुढे बॅरिस्टर पी.जी. पाटील या नावाने सुपरिचित झाले. कर्मवीर अण्णांचे मानसपुत्र म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला.

कर्मवीर अण्णा आणि बॅरिस्टर पी.जी पाटील यांच्यातील एक प्रसंग अत्यंत हृदयस्पर्शी आहे. कर्मवीर अण्णा काही कामानिमित्त पुण्याला गेले होते. काम संपल्यानंतर संस्थेतील विद्यार्थ्यांना भेटून जावे असा विचार मनात आला आणि अण्णांनी पांडुरंग पाटलांची खोली गाठली, दरवाज्यात उभे असतानाच दरवाजा उघडला गेला अण्णांच्या लक्षात आले की पांडुरंग कुठेतरी बाहेर चालले आहेत. अण्णांनी त्यांना विचारले तेव्हा थोड्या संकोचाने पांडुरंगाने सांगितले आम्ही मित्र आणि सर सिनेमाला चाललो आहे. टॉलस्टॉयच्या कादंबरीवर देशभक्तीर असा इंग्रजी सिनेमा आहे. पण आपण आला आहात म्हणून हा बेत मी रद्द करतो तेव्हा अण्णा लहान मुलासारखं लहान होऊन म्हणाले मी पण आपणा बरोबर आले तर चालेल का? आणि मग सर्वजण सिनेमा पाहायला गेले. सिनेमातील एक प्रसंग असा होता, युद्धामध्ये एका सैनिकाला गोळी लागते. सैनिक रक्तबंबाळ होतो, परंतु त्याच्या हातामध्ये असलेला ध्वज तो खाली पडू देत नाही. सिनेमा पाहत असतानाच अण्णांनी पांडुरंगाला विचारले पांडुरंगा आपल्या संस्थेचा सुद्धा ध्वज असाच फडकत राहण्यासाठी विद्यार्थी, कर्मचारी कार्य करतील का? यावरून कायमस्वरूपी संस्था आणि विद्यार्थी विचार हीच भावना त्यांच्यामध्ये होती हे दिसून येते. ज्या पांडुरंग पाटला जवळअण्णांनी संस्थेचे विचार मांडले होते तेच पाटील पुढे बॅरिस्टर झाले. परदेशात शिकून आल्यानंतरसुद्धा उच्चपदस्थ नोकरी न स्वीकारता रयत शिक्षण संस्थेची सेवा करणे हे आपले कर्तव्य मानून शेवटच्या श्वासापर्यंत रयत सेवक राहिले. बॅरिस्टर पी.जी पाटील या नावाने ते महाराष्ट्राला सुपरिचित झाले. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आणि एम. पी. एस. सी. चे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य केले; परंतु त्यांच्यामधील रयत सेवक कायमस्वरूपी जिवंत राहिला.

स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचे महत्त्व जाणले ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पदमभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. कर्मवीर अण्णांनी शिक्षणाचा वटवृक्ष लावला आणि त्याच्या आधाराने महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अनेक शिक्षण संस्था उदयास आल्या आणि शिक्षणाचे पवित्र कार्य त्यांनी अव्याहतपणे सुरू ठेवले. त्यामध्ये शिक्षण महर्षी परम पूज्य डॉ. बापूजी साळुंखे यांनी स्थापन केलेली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी स्थापन केलेली श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी, डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेली श्री शिवाजी शिक्षण संस्था, अकोला. या संस्थांनाही मार्गदर्शन करण्याची भूमिका अण्णांनी घेतली.

कर्मवीर अण्णांच्यावरती जसा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा प्रभाव होता त्याप्रमाणेच महात्मा गांधीजींच्या विचारांचाही प्रभाव होता. साधी राहणी आणि उच्च विचार यातूनच अण्णांनी नेहरूशर्ट आणि पांढरे स्वच्छ धोतर असा पोषाख कायमस्वरूपी वापरला. अनवाणी पायांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. परिसाच्या सान्निध्यात आलेल्या लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणेच अण्णांच्या सान्निध्यात आलेल्या गोरगरिबांच्या मुलांच्या आयुष्याचे सोने झाले. महात्मा गांधीजींनी ज्यावेळेला रयत शिक्षण संस्थेच्या बोर्डिंग ला भेट दिली तेव्हा त्यांना दोन विद्यार्थी असे दिसले त्यांनी संस्कृत विषयांमध्ये यश संपादन केले होते. त्यापैकी एक जातीने मुस्लीम होता तर दुसरा मातंग समाजाचा होता. जाती-धर्माच्या भिंती शिक्षणाच्या आड येत नाही त्यासाठी फक्त प्रामाणिक इच्छाशक्ती पाहिजे. तळमळ पाहिजे, हेच त्यांच्या कार्यातून दिसून येते. कमवा शिका योजनेतून शिकलेली मुले हे महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवू लागली. अण्णांना विद्यार्थी घडविण्यासाठी आणि शाळा महाविद्यालय निर्माण करण्यासाठी ज्याप्रमाणे खेड्यातील रयतेने साथ दिली त्याच प्रमाणे सद्गुरू गाडगे महाराज, यशवंतराव चव्हाण, वसंत दादा पाटील, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, छत्रपती सयाजीराव गायकवाड, छत्रपती शाहू महाराज सातारा, विठ्ठल रामजी शिंदे, क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड अशा अनेक व्यक्तींनी शिक्षणासाठी मोलाची साथ दिली.

रयत शिक्षण संस्था आज ही एक शिक्षण संस्था न राहता ज्ञानपीठ झालेले आहे. विचारपीठ झालेले आहे. कर्मवीर अण्णांनी सांगितलेले विचार जर आपण अंगीकारले तर भविष्यकाळामध्ये जाती व्यवस्थेतील अनिष्ट रूढी परंपरा, दारिद्र्य, अनाचार, भ्रष्टाचार यापासून आपला सर्व समाज मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी केवळ कर्मवीर अण्णा यांचे विचार उपयुक्त ठरतील यात शंका नाही. सह्याद्री पर्वतासारखे उत्तुंग व्यक्तिमत्त्व कर्मवीर अण्णांच्या रूपाने महाराष्ट्राला लाभले हे सामान्य जनतेचे भाग्य आहे.


2 comments:

  1. कर्म ज्यांचे मनी
    कर्म ज्यांचे ध्यानी
    द्वैत न करिती
    कर्म नि वाणी
    ते कर्मवीर जाहले,
    कर्मवीरांनी कोटी कोटी विनम्र अभिवादन

    ReplyDelete
  2. कर्मवीर अण्णांना विनम्र अभिवादन

    ReplyDelete