प्राचार्य अभयकुमार साळुंखे कार्यअध्यक्ष
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी अनेक अभंग लिहिले त्यामधील एक सुप्रसिद्ध अभंग
पुत्र व्हावा ऐसा गुंडा। ज्याचा तिन्ही लोकी झेंडा। कन्या ऐसी देई। जैसी मिरा मुक्ताबाई।।
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक, संकल्पक शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांनी जी ज्ञानगंगा कर्मवीर अण्णांच्या विचाराने खेड्यापाड्यांमध्ये नेण्याचे कार्य केले त्यामधून बापूजींनी शिक्षणाचा झेंडा तिन्ही लोकांमध्ये फडकविण्याचे कार्य केले. संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे या नावाप्रमाणेच बापूजींची आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची आजन्म सावली बनून राहिल्या मीरा आणि मुक्ताबाईंचे त्यागाचे वर्णन जर पाहिचे असेल तर ते संस्थामातेच्या जीवनातून दिसून येते, त्या कार्याचा, सुसंस्काराचा वारसा जपणारे प्राचार्य अभयकुमार साळुंखे. आज मी या लेखांमध्ये आदरणीय प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी मातृऋण किंवा ज्ञानाचे सुसंस्कार काय असतात हे सिद्ध करण्यासाठी जे कर्तुत्व उभे केले त्याबद्दल येथे लिहिणार आहे.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर या संस्थेच्या महाराष्ट्रामध्ये अनेक ज्ञानशाखा आहेत त्यापैकीच एक म्हणजे संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय तासगाव. मुलींच्या शिक्षणाचे आणि सबलीकरणाचे एक सुसंस्कार केंद्र म्हणून या शाखेकडे पाहिले जाते या महाविद्यालयाने अनेक उत्तम शिक्षिका समाजाला दिल्या. सुसंस्कार देण्याचे कार्य महाविद्यालय अविरतपणे पूर्ण करत होते पण आजच्या प्रगत विज्ञान युगात उत्तम शिक्षण देणारी प्रयोगशाळा तयार करण्यासाठी काय केले पाहिजे हा विचार महाविद्यालयाच्या प्रत्येक घटकाला वाटत होता. थोडक्यात महाविद्यालयाला शैक्षणिकदृष्ट्या सुसज्ज अशी इमारत असली पाहिजे असे प्रत्येकाच्या मनात होते. त्यादृष्टीने काय प्रयत्न करता येतील असा विचार महाविद्यालय विकास समितीच्या बैठकीत चर्चेला आला आणि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम पाटील सरांनी प्रयत्न करावेत, साहेबांना विनंती करावी असे ठरले. उत्तम कार्य करायचे असेल तर योगही निश्चित येतो आणि त्याप्रमाणे संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय तासगाव या शाखेला भेट देण्यासाठी 2019 मध्ये योग आला. प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब शाखा भेट देण्यासाठी तासगाव शहरात आले होते आणि त्यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बी एम पाटील सर यांनी साहेबांना एक
विनंती केली. शाखेची इमारत खूपच जुनी झाली आहे आणि ती बांधली पाहिजे. हे म्हणत असताना मी दोघांनाही पाहत होतो बी.एम सर थोडे
धास्तावलेले होते, तर साहेबांची भावमुद्रा थोडी गंभीर होती. पण साहेब कोणत्याही क्षणी निर्णय योग्य देणार असे माझ्या अंतर्मनाला नेहमी वाटत होते. आणि त्याप्रमाणेच आपण तसा आदेशही आम्हाला दिला बांधकाम सुरू करा पण नगरपालिका तासगावची परवानगी घेतल्याशिवाय मी मान्यता देणार नाही. साहेब ही आज्ञा म्हणून बी एम पाटील सर कामाला लागले आणि बापूजींच्या आशीर्वादाने आणि संस्था मातेच्या आशीर्वादाने त्यामध्ये कोणतेही विघ्न आले नाही तासगाव नगर परिषदेने योग्य त्या पद्धतीने शाखा बांधकामास परवानगी दिली. त्यानंतर बांधकाम सुरू झाले पण कोरोनाला हे जगावरच आलेले एक संकट होते. आणि अशावेळी शाखा विस्तारापेक्षाही ज्ञानदान करणे हे आद्य कर्तव्य आहे असे आपण प्रत्येक ऑनलाईन मीटिंगमध्ये सांगत होता. काही काळ बांधकाम हे स्थगित ठेवावे लागले पण योग्य वेळ आल्यानंतर आपण सर्व अडचणी दूर केल्या आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची तासगाव शहरातील अत्यंत दिमाखदार अशी इमारत आपल्या कार्यकर्तृत्वाने उभी राहिली, याबद्दल मी गुरुदेव कार्यकर्ता म्हणून आपला अत्यंत ऋणी आहे. यामधून मला प्रत्येक वेळी न पाहिलेल्या बापूजींचे पण वाचण्यात आलेले विचार आपल्या रूपाने पाहायला मिळाले .
बापूजी नेहमी म्हणत की माझ्या ज्ञानशाखेच्या इमारती या त्या
गावातील लोकांच्या लोकवर्गणीतून उभ्या राहणे महत्त्वाच्या आहे. यासाठी गरीबाच्या एक रुपया मिळालेली वर्गणी ही मला लाख मोलाची वाटते. महाविद्यालयाने समाजातील घटकांना तशा प्रकारची विनंती केली आणि समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी इमारत बांधकामासाठी आपले मोलाचे सहकार्य आर्थिक स्वरूपात दिले. ज्या पद्धतीने इमारत पूर्ण झाली शैक्षणिक सुविधा संस्थेने पुरविल्या त्याचा विचार करता या ज्ञानशाखेचा उपयोग तासगाव तालुक्यातील अनेक
शाळांना होणार आहे आणि महाविद्यालयाचा प्रत्येक घटक त्यासाठी प्रयत्नशील आहे. योगशिक्षण आणि माहिती तंत्रज्ञानाचे शैक्षणिक कार्यातील महत्त्व विचारात घेऊन पुढील भविष्य काळात सुसंस्कारित पिढी तयार करण्यासाठी महाविद्यालय सतत प्रयत्न करत राहील. आपल्या मार्गदर्शनातून हा विचार आपण सतत आम्हाला सांगत आलेला आहात ही जाणीव मनामध्ये ठेवून तसा प्रयत्न आम्ही निश्चितच करणार आहोत.
साहेब ही वास्तु भविष्यामध्ये मुलींच्या शिक्षणाचे, सुसंस्काराचे उत्तम केंद्र म्हणून निश्चितच नावारूपाला येईल याबद्दल आमच्या महाविद्यालयातील प्रत्येकाच्या मनात कोणतीही शंका नाही. महाविद्यालयाची इमारत झाली पण इमारतीमध्ये एक सुंदर पुतळा असला पाहिजे हा हट्ट आम्ही आपणाकडे धरला आणि तोही आपण पूर्ण केला संस्थामाता आणि बापूजी यांचा एकत्रित पुतळा वास्तूची शोभा वाढविणारा आहे त्याबरोबरच महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थिनीला संस्थामातेचे कार्य पुतळ्याद्वारे प्रेरणा देणारे ठरणार आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या या महाविद्यालयाला आपण विशेष दर्जा दिला मातेचे ऋण कधीही फेडता येत नाही पण पुत्र व्हावा ऐसा गुंडा। ज्याचा तिन्ही लोकी झेंडा। या विचाराने आपण ही वास्तु उभा केली त्याबद्दल
भविष्यकाळात सावित्रीच्या लेकी आपल्या ऋणात राहतील.कै.संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे
यांना सुद्धा स्वर्गांआनंद झाल्याशिवाय राहणार नाही.
डॉ.अनिल पाटील
तासगाव

कर्मवीर आण्णा, कर्मवीर मामा, बापूजी साळुंखे यांसारख्या सामान्य माणसांसाठी असामान्य काम करणाऱ्या महान विभूतीच्या शैक्षणिक पथाचे आपणास वाटसरू होता आले हे आपले परमभाग्य आहे. त्यांच्या संस्काराची शिदोरी घेऊन प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेबांसारखे दृष्ट्ये नेत्तृत्व आणि आपण सर्व कर्माची पूजा करणारे पाईक, खंदे कार्यकर्ते आहात. आपल्या कृतीमागील भावना शुद्ध आहे त्यामुळे केवळ अशा उंच इमारती उभ्या राहत नाहीत तर उच्च संस्कार, जीवनमूल्ये आणि विचारांची भक्कम पायाभरणी होते. .त्याचीच प्रस्तुत लेखातून 'शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी' याची प्रचिती येते.
ReplyDelete