Saturday, 3 February 2024

वसा घेऊया कर्मवीरांचा






वसा घेऊया कर्मवीरांचा
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांची आज 121 जयंती. गणिती भाषेमध्ये सांगायचे तर 11 या संख्येचा वर्ग आणि भारतीय संस्कृतीमध्ये 11 ही संख्या शुभ मानली जाते, आजच्या या शुभ दिनी मामांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.

कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी जनतेच्या मनामध्ये शिक्षणाद्वारे संस्कार घडविण्याचे कार्य केलेले आहे. ज्या पद्धतीचे शिक्षण मामांना अभिप्रेत होते ते शिक्षण म्हणजे संतश्रेष्ठ तुकारामाच्या भाषेमध्ये एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ.

कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या शैक्षणिक कार्यावरती संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि तीर्थरूप कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील अण्णा यांच्या विचाराचा प्रभाव होता. महाराष्ट्र मधील सर्व समाज सुधारकांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून शिक्षण संस्था उभ्या केल्या त्यामध्ये कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ ही एक संस्था. या संस्थेने अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेतला. त्यामधीलच एक अत्यंत महत्त्वाचा आणि हृदयस्पर्शी उपक्रम म्हणजे कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे हॉस्पिटल. व्यक्तीचे आरोग्य ही चांगले राहिले पाहिजे, आरोग्याच्या सुविधा अतिशय कमी खर्चामध्ये पण दर्जेदार आणि सर्वसामान्यांना परवडतील अशा कशा देता येईल  यासाठी मामांनी त्यांच्या हयातीमध्ये डॉ. बी. वाय यादव यांच्या बरोबर चर्चा करून ती जबाबदारी डॉक्टर यादव साहेबांच्या कडे सोपवली. कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांनी पाहिलेले स्वप्न त्यांच्या सर्व सहकार्यांनी पूर्ण केले त्यामुळे शिक्षण संस्थेबरोबरच मामासाहेब जगदाळे हॉस्पिटल बार्शी हे मामांचा वारसा जपणारे एक सामान्य लोकांसाठी अशास्थान ठरले. भगवंताच्या नगरीमध्ये मामांच्या विचारातून सर्वसामान्यांसाठी आरोग्य पंढरी अवतरली असे म्हणावेसे वाटते.

कर्मवीर मामासाहेब जगदाळे सामान्य कुटुंबातून जन्माला आलेले असताना सुद्धा समाजातील अति सामान्य व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्ञानज्योत लावणारे कर्मवीर झाले त्यामुळे, शंभर वर्षानंतर सुद्धा  जयंती उत्साहात साजरी केली जाते.

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांचे शैक्षणिक विचार आणि चरित्र समाजाला  आजही तितकेच मोलाचे वाटते याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाहीआधुनिक शिक्षणाच्या संकल्पना बदलत असताना सुद्धा माणसाने माणसाबरोबर आदराने वागले पाहिजे. एकमेकांना सहाय्य केले पाहिजे.जात, धर्म, भेदभाव मानता मामांची दिलेली शिकवण आचरणात आणली पाहिजे असे प्रत्येक विद्यार्थ्यांनी जर ठरविले तर येणाऱ्या काळामध्ये बार्शी सारख्या पवित्र भूमीतून पुन्हा एकदा कर्मवीर मामासाहेब जगदाळे जन्माला येतील असे नक्की म्हणावेसे वाटते.

मामासाहेब जगदाळे यांचा विचारांचा वसा घेणे म्हणजे, त्यांचा एक विचार पुढील आयुष्यामध्ये आचरणात आणणे. हा सोपा मूलमंत्र आहे, असे मला वाटते.कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचे जीवन अत्यंत साधे आणि ऋषीलाही लाजवेल अशा त्यागी वृत्तीचे होते. मामांनी केलेला त्याग हा जर आपण आचरणात आणला तर वसा घेऊया कर्मवीरांचा बहुजन साऱ्या सुखवाया या वृत्तीने समाज घडत जाईल. ते जावो ही भगवंत चरणी प्रार्थना.

डॉ.अनिल पाटील 

तासगाव

 


 

2 comments:

  1. कर्म ज्यांचे ध्यानी
    कर्म ज्यांचे मनी
    द्वैत न करिती
    कर्म नि वाणी......ते कर्मवीर जाहले

    ReplyDelete
  2. समाजातील थोर पुरुषांची जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यामागे , त्यांचे आचार, विचारांचे पुढील पिढीमध्ये संक्रमण व्हावे हाच उद्देश असतो. आपला लेख खूप उद्बोधक आहे. कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचे कार्य हा समाजापुढे एक आदर्श आहे. जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

    ReplyDelete