Friday, 6 June 2025

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि भारतीय ज्ञान परंपरा

महाराष्ट्रातील सातारा जिल्हा हा स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य सेनानींचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. महाराष्ट्राला आणि भारताला अनेक स्वातंत्र्यवीर या जिल्ह्याने दिले आहेत. त्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी,क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण,स्वर्गीय पद्मभूषण डॉ. वसंत दादा पाटील, स्वर्गीय राजाराम बापू पाटील अशा अनेकांचा उल्लेख करता येईल. या स्वातंत्र्य सेनानी बरोबरच अनेक स्वातंत्र्यवीरांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या कामी आपले योगदान दिलेले आहे. त्यामध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थांचे संकल्प, संस्थापक परमपूज्य डॉ. बापूजी साळुंखे यांचाही उल्लेख करावा लागेल. डॉ.बापूजी साळुंखे हे नाव उच्चारल्याबरोबर आपल्यासमोर उभे राहते श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था. परंतु शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना करण्यापूर्वी शालेय जीवनापासूनच महात्मा गांधीजींचा सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला होता. त्यामुळे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्री सरकारमध्ये कार्य करण्याचे भाग्य बापूजींना लाभले होते. क्रांतीसिंह नाना पाटील जे सांगतील ते काम करण्यासाठी बापूजी साळुंखे नेहमीच अग्रेसर होते. त्यामधूनच त्यांची ओळख एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून निर्माण झाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बापूजींच्या समोर समाजसेवेचे अनेक मार्ग उपलब्ध होते, परंतु शिक्षण प्रसाराचा मार्ग स्वीकारून संपूर्ण आयुष्यभर शिक्षण प्रसाराचे व्रत बापूजींनी हाती घेतले. संन्यस्त वृत्तीने हे काम आयुष्यभर करत राहिले. कर्मवीरांच्या नंतर जर कोणी महाराष्ट्र शैक्षणिक दृष्ट्या घडविला असेल तर तो शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांनी. पूर्वीच्या सातारा जिल्ह्याने जसे स्वातंत्र्य सेनानी जन्माला घातले त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये अमुलाग्र क्रांती करणारे पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिक्षण महर्षी डॉ .बापूजी साळुंखे हे याच भूमीत जन्माला आलेले थोर महापुरुष. पद्मभूषण कर्मवीर डॉ. अण्णांनी शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजन समाजाच्या अंगणात घेऊन गेले ते रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेतून. कर्मवीर अण्णांना त्यामुळेच महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या विचाराचे वारसदार असे म्हटले जाते. कर्मवीरांना बहुजनांच्या शिक्षणासाठी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून खेड्यापाड्यात प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणाचे स्त्रोत निर्माण केले. सुरुवातीच्या काळामध्ये रयत शिक्षण संस्थेत रयत सेवक म्हणून कार्य केले. बापूजी साळुंखे यांनी कर्मवीर अण्णांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजविले. केवळ एकच एक शिक्षण संस्था शिक्षण प्रचाराचे कार्य करू शकेल असे नाही या विचारातून बापूजी साळुंखे यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली. डॉ. बापूजी साळुंखे हे गांधीवादी विचाराचे थोर स्वतंत्र सेनानी होते. त्याबरोबरच श्री स्वामी विवेकानंद यांच्या तत्त्वज्ञानाचे ते एक अभ्यास होते.युवकांच्या बद्दल असलेले विचार आणि राष्ट्रप्रेम या भावनेतून बापूजींनी श्री स्वामी विवेकानंद हे नाव आपल्या शिक्षण संस्थेला दिले. श्री स्वामी विवेकानंद हे भारतीय तत्त्वज्ञानाचे तत्वचिंतक आणि सुसंस्काराचे प्रतीक आहेत यातूनच बापूजींनी श्री स्वामी विवेकानंद हे नाव निश्चित केले असावे. ज्याप्रमाणे स्वामी विवेकानंदांना रामकृष्ण परमहंस यांच्या योगसामर्थ्याने कालिकामातेचे दर्शन झाले त्यावेळी युवा अवस्थेतील विवेकानंदांनी कालिकामातेला ज्ञान, भक्ती, विवेक आणि वैराग्य या गोष्टी मागितल्या भौतिक सुखाची कोणतीही लालसा त्यांच्या मनामध्ये राहिली नाही हाच विचार बापूजींनी आपल्या संस्थेच्या प्रार्थनेमध्ये केलेला दिसून येतो. आजही आपण स्वामी विवेकानंदांचे हे विचार मूल्यसंस्कार म्हणून स्वीकारलेले आहेत. शिक्षण संस्था स्थापन केल्यानंतर केवळ संस्थापक अध्यक्ष म्हणून मिरविण्यासाठी ही संस्था बापूजींनी स्थापन केलेली नव्हती तर भारतीय युवकांच्या मध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी सत्य,शील प्रामाणिकता, त्याग, पिळवणुकीस आळा हे विचार रुजविण्याचे कार्य बापूजींनी करण्याचे निश्चित केले होते. त्यातूनच ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीदवाक्य बापूजींनी आपल्या संस्थेला दिले. आज आपण राष्ट्रीय शिक्षण अभ्यासक्रम आराखडा 2020 चा विचार करताना भारतीय ज्ञान परंपरा याचा विचार करतो तो विचार डॉ. बापूजी साळुंखे यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था स्थापन करत असतानाच केलेला होता, त्यामुळे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्य हे इंडियन नॉलेज सिस्टीम किंवा भारतीय ज्ञान परंपरेला साजेसे असेच घडलेले आहे. भारतीय ज्ञानपरंपरेत ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. व्यक्तीमध्ये जे सुप्तावस्थेत आहे पण अज्ञानामुळे प्रकट झालेले नाही ते प्रकट करण्यासाठी सुसंस्काराची आवश्यकता आहे. ज्यावेळी व्यक्ती ज्ञानी होते त्यावेळी त्याला समाजाबद्दल, समाजातील व्यक्तीबद्दल, एक प्रकारचा आत्मिक जिव्हाळा निर्माण होतो. बापूजींना अभिप्रेत असलेले ज्ञान हे आत्मज्ञान आहे आणि तोच भारतीय संस्कृतीचा पाया मानला जातो. भारतामध्ये अनेक शिक्षण संस्था निर्माण झाल्या त्या शिक्षण संस्थेने ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांनी स्थापन केलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची प्रार्थना स्वतः लिहिली हे अतिशय उल्लेखनीय असे कार्य आहे. या प्रार्थनेतून बापूजींना अभिप्रेत असलेले विद्यार्थी कसे असले पाहिजेत हे सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांना प्रार्थनेतून सुस्पष्ट झाले. संस्थेच्या प्रार्थनेमध्ये सर्वधर्मसमभाव मांडलेला आहे त्यामध्ये राम कृष्ण ,रहीम, ख्रिस्त बुद्ध, झरतृष्ठ आणि महावीर या संतांचा उल्लेख मानव्याचे दीपस्तंभ असा केलेला आहे, त्यांच्या विचाराचे वंदन करणे हे बापूजींना अभिप्रेत आहे. शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये शिकत असलेला विद्यार्थी सत्य,शील प्रामाणिकता, त्याग, पिळवणुकीस आळा घालणारा असला पाहिजे हेच मानव्याचे अधिष्ठान आहे आणि ईश्वराचे दर्शन आहे असे बापूजींनी आपल्या प्रार्थनेत म्हटलेले आहे विवेकातून शिक्षणाचा आनंद प्राप्त होतो आणि आत्मिक समाधान लाभते यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार हे तत्व आपल्या जीवनात अंगीकारले पाहिजे. प्रार्थनेच्या शेवटी अग्नी देवतेची उपासना करून शेवट केलेला आहे. ही प्रार्थना आजही सर्व संस्कार केंद्रामध्ये सुस्वारात म्हटली जाते विद्यार्थी आणि गुरुदेव कार्यकर्त्यांना त्यामधून एक प्रकारचे आत्मिक बळ प्राप्त होते हेच या प्रार्थनेचे यश आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था स्थापन झाल्यानंतर बापूजींनी प्राथमिक, माध्यमिक शाळा स्थापन केल्या, परंतु महाविद्यालय स्थापन करत असताना पहिले महाविद्यालय मराठवाड्यातील धाराशिव येथे स्थापन केले. या महाविद्यालयाचे नामकरण रामकृष्ण परमहंस महाविद्यालय असे करण्यात आले. मराठवाडा विद्यापीठांतर्गत येणारे हे महाविद्यालय रामकृष्ण परमहंस यांच्या विचाराचे अध्यासन केंद्र आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. रामकृष्ण परमहंस हे श्री स्वामी विवेकानंदांचे आध्यात्मिक गुरु, स्वामी विवेकानंदांना सामाजिक कार्यामध्ये दिशा देणारे रामकृष्ण परमहंस होय. रामकृष्ण परमहंस यांच्या नावाचे पहिले महाविद्यालय स्थापन करून बापूजींनी आपल्या शैक्षणिक कार्याची दिशा निश्चित केली. रामकृष्ण परमहंस हे लौकिक अर्थाने शिक्षित नव्हते परंतु त्यांच्याकडे भारतीय संस्कृतीकडे पाहण्याचा एक अलौकिक असा दृष्टिकोन होता, त्यामधूनच आजचा मंगलमय भारत घडत गेला, हे घडविण्याचे कार्य एका युवकांनी केले त्या युवकाचे नाव होते श्री स्वामी विवेकानंद. रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदासाठी सद्गुरु होते आणि या सद्गुरूची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला जर कोणी करून दिले असेल तर ते म्हणजे बापूजी साळुंखे यांनी. ज्ञान मिळविल्यानंतर त्या ज्ञानाचा उपयोग भारतातल्या गोरगरीब, दारिद्र्यात खितपत पडलेल्या समाजासाठी करावा. ज्ञानी लोकांनी अत्यंत साधे राहणीमान स्वीकारावे. भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख, विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान आणि सुसंस्कार रुजविण्यावर डॉ. बापूजी साळुंखे यांनी आयुष्यभर दिला आणि हाच खरा भारतीय ज्ञान परंपरेचा आत्मा आहे. प्रा.अनिल पाटील धाराशिव

1 comment:

  1. नमस्कार सर 🙏आपण वरील लेखात डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जीवनकार्याचा सखोल आणि प्रेरणादायी आढावा घेतला आहे. त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील सक्रिय सहभागापासून ते श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या स्थापनेसह शिक्षण क्षेत्रातील अमूलाग्र बदल घडविण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत उल्लेखनीय आहे. त्यांच्या शिक्षणतत्त्वज्ञानात सत्य, शील, प्रामाणिकता, त्याग आणि सुसंस्कार यांचा समावेश असून, भारतीय ज्ञानपरंपरेला साजेशी अशी त्यांची कार्यपद्धती प्रेरणादायी ठरते. त्यांच्या कार्यामुळे आज महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे. त्यांच्या या योगदानामुळे त्यांना 'शिक्षणमहर्षी' म्हणून गौरविण्यात आले आहे. त्यांनी केलेले बीजारोपण भारतीय ज्ञान परंपरेत भर घालणारे आहे.

    ReplyDelete